छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबलेल्या महापालिकेतील नोकर भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. २२२ पदांसाठी पुढील आठ दिवसांत जाहिरात प्रसिद्ध होईल, असे सूत्रांनी सांगितले.
महापालिकेतील निवृत्त होणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचार्यांचा प्रशासनाला आधार घ्यावा लागत आहे. आजघडीला सुमारे २ हजार कंत्राटी कर्मचारी महापालिकेत नियुक्त आहेत. कंत्राटी कर्मचार्यांची संख्या वाढत असताना कायम कर्मचार्यांची संख्या कमी होत आहे. आस्थापना खर्चाच्या अटीमुळे नोकर भरती करताना अडचणी येत आहेत. राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने नोकरभरती करण्यास महापालिकेला परवानगी दिलेली आहे. त्यानुसार गेल्या दीड वर्षापासून २२२ पदे भरण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू होती. शासन, विभागीय आयुक्तांच्या मंजुरीनंतर भरतीचा मार्ग मोकळा झाला होता. पण, त्यात महापालिका निवडणुका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्रशासनाला जाहिरात प्रसिद्ध करता आली नव्हती. आचारसंहिता संपल्यामुळे पुढील आठ दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
कनिष्ठ अभियंता, उपअग्निशमन अधिकारी, सहायक सुरक्षा अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, चालक यंत्रचालक, उद्यान सहायक, अनुरेखक (ट्रेसर), रोखपाल या रिक्त पदांवर भरती होणार आहे.











